ऊर्जा निर्मितीसाठी इरई धरणाचे संवर्धन केले जाईल : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चंद्रपूर जिल्ह्यातील महाजनको अंतर्गत येणाऱ्‍या वीज निर्मिती प्रकल्पास इरई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कक्षात आज चंद्रपूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागांशी निगडीत विविध समस्यांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल, संचालक (खाण) श्याम वर्धने उपस्थित होते.

इरई धरणाचे संवर्धनयावेळी चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) चा वीज निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पाला लागणारे पाणी हे इराई धरणातून आणले जाते. सध्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे वीज निर्मिती करण्यास पुढील काळात समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या निर्माण होऊ नये यासाठी चारगाव धरणाचे पाणी इराई धरणाला सोडले जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय पाण्याची पातळी वाढविण्यासंदर्भातील इतर उपाय योजनाही आखण्यात येतील, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. इराई धरणाचे संवर्धन करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आणि महाजनकोमध्ये करार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सौरऊर्जा महामंडळाच्या मदतीने ऊर्जा प्रकल्पमहाजनकोचा चंद्रपूर जिल्ह्यातील रिकाम्या जागेचा अभ्यास करून या ठिकाणी भारत सरकारच्या सौरऊर्जा महामंडळ आणि महाजनकोमध्ये करार करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचे बैठकीत निश्चित करण्यात आले.