कोरेगाव भीमा दंगलतील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
जानेवारी महिन्यात घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. मात्र, गंभीर खटल्यांच्या बाबतीत समिती निर्णय घेईल. तीन महिन्यात याबाबत पोलीस समितीकडे अहवाल देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत एकूण 58 गुन्हे दाखल झाले असून, 162 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवाय, जखमींमध्ये 60 पोलीस आणि 58 नागरिकांचा समावेश आहे. “हिंसाचाराच्या घटनेनंतर एकूण 17 अट्रोसिटी आणि 600 हून अधिक गुन्हे दाखल झाले. त्यात 1199 आरोपींना अटक करण्यात आली असून, 2 हजार 53 व्यक्तींवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली.”,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव प्रकरणात 13 कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले. यासंदर्भात काही ठराविक आकडेवारीही मुख्यमंत्र्यांनी सादर केली. यामध्ये कोरेगाव-भीमा घटनेच्या ठिकाणी एकूण 9 कोटी 45 लाख 49 हजार 95 रुपयांचे नुकसान झाले. याची नुकसान भरपाई झाली. यापैकी दलित समाजाचे एक कोटींहून अधिक, तर मुस्लिम 85 लाखांहून अधिक नुकसान झाले.