गाडी घासल्याच्या कारणावरुन वकिलाला मारहाण करणाऱ्या सहा जणांना पोलीस कोठडी

पुणे:पोलीसनामा आॅनलाईन
कारला गाडी घासली अशी विचारणा करत वकिलाला मारहाण करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भोसरी पोलीसांनी केली असून न्यायालयाने आरोपींना 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.

गोकुळ कृष्णा निखाडे (वय २२), शुभम बाबुराव तायडे (वय-१९),आकाश महादेव काळपांडे (वय-२४), अतुल मुरलीधर नाईक (वय-२२), राजकुमार उमाजी डामसे (वय-२०) आणि जगदीश दिगंबर झंगळवाड (वय-१८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अ‍ॅड.राजेश किसन वाघ (वय-३४, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ हे 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान कारमधून जात असताना जुना- मुंबई हायवेवरील मीनाताई ठाकरे शाळेजवळ आले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या कारच्या समोर चारचाकी आडवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर त्यांना कारच्या बाहेर आेढत, शिवीगाळ करत, आमच्या कारला गाडी का घासली म्हणत मारहाण केली. मारहाण करत त्यांच्याकडून मोबाईल, सोन्याची चैन आणि रोख रक्कम काढून घेतली. त्यामुळे वाघ यांनी याप्रकरणी भोसरी पोलीसांत तक्रार दिली होती.

त्यामुळे आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले होते. गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी आणि आरोपींनी या प्रकारचे आणखी काही गुन्हे केलेत का याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली होती. ती न्यायालयाने मान्य करुन आरोपींना 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.