गुटखा विक्रीस प्रोत्साहन देणा-या अधिका-यांची दक्षता पथकामार्फत चौकशी

सीआयडी चौकशीची मुंडे यांची मागणी

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन
राज्यात सुरु असलेल्या गुटखा विक्रीवर कडक कारवाई करण्यासाठी याचा तपास हा दक्षता पथकामार्फत करण्याचे स्पष्ट आश्वासन आज अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विरोधीपक्ष् नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.
गुटखा विक्री करणाऱ्याविरोधात नॉन बेलेबल गुन्हा दाखल केला जावा यासाठी कायदा करू तसेच दक्षता पथकाच्या चौकशीने मुंडे यांचे समाधान झाले नाही तर सीआयडीमार्फत या प्रकरणाची चौकशी करू असेही आश्वासन बापट यांनी दिले.

विधान परिषदेत मुंडे यांनी याबाबत लक्षवेधी दरम्यान गुटखा बंदी असतांना राज्यात गुटखा विक्री होतेच कशी ? असा सवाल केला. परीमंडळ 5 ( भिवंडी ) मध्ये गुटखा उत्पादन, विक्री सर्वात जास्त आहे , याची चौकशी सीआयडी मार्फत करावी विभागातील अधिका-यांची चौकशी करून दोषी अधिका-यांविरुद्ध एसीबी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. राज्यात अनेक ठिकाणी सापडलेल्या गुटखा आणि तत्सम उत्पादनावरून गुटखा विक्री कशी सुरु आहे याचे दाखले मुंडे यांनी यावेळी दिले.राज्यात महसुली उत्पन्नाचा विचार न करता आणि जनतेच्या आरोग्याचा कोणताही विचार न करता उघडपणे राज्यात बंदी घातलेली असताना गुटखा,पानमसाला याबरोबरच सुगंधित सुपारी, तसेच तंबाखू व खरा विकले जाते असल्याचा मुद्दा मुंडे यांनी उपस्थित करत याविषयी प्रभावी अशी कार्यवाही होत नाही असे सांगत यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती देत यावर तात्काळ कारवाई करावी,सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी गुटखा विक्री विरोधात अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करणार असे सांगितले. गुटखा विक्रीस प्रोत्साहन देणा-या अधिका-यांची दक्षता पथकामार्फत चौकशी करू व प्रसंगी सीआयडी चौकशी करू असे आश्वासन ही त्यांनी दिले