डॉलर देण्याच्या बहाण्याने व्यापा-याची फसवणूक करणारे गजाआड

हडपसर: पोलिसनामा ऑनलाईन

हडपसर येथील किराणा मालाच्या व्यापा-याला डॉलर देण्याच्या बहाण्याने फसवणा-या दोन भामट्यांना गुंडा स्कॉड नॉर्थ विभागाच्या पोलिसांनी अटक करुन पाच लखांची रोकड जप्त केली. हा प्रकार सोमवार (दि.4) हडपसरमधील वैभव टॉकीज जवळील शर्मा स्विट होमच्या पाठीमागे घडला होता.

किशोर कुमार चंद्रदास वैष्णव (वय-26 रा. मुंढवा) आणि राहुल सिंग छन्नुलाल वाल्मिकी (वय-28, रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सनी सतीश अग्रवाल (वय-28, रा. विमानगर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सनी अग्रवाल यांच्या बहिणीला लंडन येथे शिक्षणासाठी जायचे आहे. त्यासाठी त्यांना डॉलरची आवश्यकता होती. दरम्यान त्यांच्या ओळखीच्या राहुल सिंग याने डॉलर मिळवून देतो असे सांगून हडपसर येथे बोलवले. सनी यांनी पाच लाख रुपये घेऊन राहुल याने बोलवलेल्या ठिकाणी गेले. त्याठिकाणी राहूलने इतर तीन जणाची ओळख करुन दिली. त्या इसमांनी सनी यांच्याकडून पैशांची बॅग घेऊन त्या बदल्यात त्यांना न्यूज पेपरमध्ये गुंडाळून डॉलर म्हणून साबण दिले. ही बाब सनी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

गुंडा स्कॉडच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन किशोर वैष्णव याच्या घरातून लुटलेली पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.