डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश मे.शापूरजी पालनजी कंपनी प्रा. या कंपनीला देण्यात आले आहेत. प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून स्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

सदस्य शरद रणपिसे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथील स्मारकासाठी मे.शापूरजी पालनजी कंपनी प्रा. या कंपनीची निविदा रक्कम रुपये 709 कोटी इतकी मंजूर करण्यात आली आहे. यानुसार त्यांना 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. कंपनीला तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. कामाचे महत्वाचे टप्पे दोन वर्षात आणि इतर अनुषंगिक कामांसाठी आणखी एक वर्ष देण्यात आले आहे. या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल.

प्रस्तावित स्मारकाच्या संदर्भात जागा हस्तांतरणाबाबत औपचारिक बाबींची पूर्तता, सीआरझेड अधिसूचनेच्या अनुषंगाने मान्यता, मंजूर विकास योजनेमध्ये आरक्षणासाठी फेरबदल या वैधानिक बाबींची पूर्तता, संकल्पना नकाशाबाबत संबंधित व्यक्ती व संस्था यांची मते विचारात घ्यावयाची असल्याने तसेच मागवण्यात आलेल्या निविदांना पहिल्या प्रयत्नात योग्य प्रतिसाद मिळालेला नसल्याने, स्मारकाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यासाठी कालावधी लागला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या मुंबईतील स्मारकाची कामे करताना किमान 300 वर्षे टिकू शकेल, अशा स्टीलचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभागृहातील सदस्यांसमवेत स्मारकाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.