दरोडेखोरांची पोलीस पथकावर दगडफेक; तीन पोलीस जखमी

आष्टी : पोलीसनामा आॅनलाईन
आष्टी तालुक्यातील कानडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना आज घडली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांनी एका दरोडेखोरास ताब्यात घेतले असून, इतर तिघे पळण्यात यशस्वी झाले.

आष्टी तालुक्यातील कानडी शिवारात असलेल्या बंधाऱ्याच्या बाजूला नदीपात्राजवळ आटल्या ईश्वर भोसले, सचिन ईश्वर भोसले,व सोन्या हा त्यांच्या इतर सहकाऱ्या सोबत मोटारसायकलवरून दरोड्याच्या तयारीने येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहीतीच्या आधारे आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद, उपनिरीक्षक मुबारक शेख यांनी आपल्या पथकाच्या मदतीने कानडी शिवारात सापळा लावला.कानडी शिवाराकडे रात्री पावणे अकाराच्या सुमारास दोन मोटारसायकलसह काही अज्ञात लोक हेडलाईट चालू बंद करत येत असल्याचे दिसले. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी धाव घेतली असता मोटारसायकल चालकाने पोलीस कर्मचारी लोहार, पठाण आणि शिकेतोड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, यात पठाण आणि शिकेतोड हे कर्मचारी जखमी झाले. यावेळी गुजर आणि कळसाने यांनी दुचाकीवरील एकास पकडले तर दुसरा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचवेळी दुसऱ्या मोटारसायकलचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक करुन दरोडेखोर पळून गेले. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी पिंपळे जखमी झाले.

सचिन ईश्वर भोसले (रा.वाहीरा) असे पकडलेल्या दरोडेखोराचे नाव असून तो औरंगाबाद ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण मधील अनेक गुन्ह्यात ‘वॉंटेड’ आहे. त्याच्याकडून एक चॉपर आणि मोटारसायकल (एमएच १६ बीएक्स ४७८७) जप्त करण्यात आली आहे. तर, पळून जाण्यात यशस्वी झालेल्या दरोडेखोरांमध्ये आटल्या ईश्वर भोसले, ईश्वर भोसले आणि अन्य एकाचा समावेश आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर आष्टी येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.