नाबार्डच्या माध्यमातून 2600 कोटीची ठिबक सिंचन योजना: सदाभाऊ खोत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून 2600 कोटीची ठिबक सिंचन अनुदान योजना राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे खोत यांनी सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांना शेती औजारे खुल्या बाजारातून घेण्यासाठी अनुदान योजना गेल्या दोन वर्षात प्रभावीपणे राबविली अाहे. ठिबक सिंचनासाठी यंदा राज्याला 700 कोटी रुपये उपलब्ध होत असून ठिबक सिंचनाची ऑनलाईन प्रक्रिया वर्षभर शेतकऱ्यांसाठी सुरु ठेवली जाईल.

ठिबक सिंचनासाठी सरसकट अनुदान देण्याबरोबरच पाणी पुरवठा संस्थांनाही ठिबक सिंचनासाठी अनुदान देण्याचा शासनाचा मानस आहे. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, औजारे, प्रगत कृषि तंत्रज्ञान या सर्व गोष्टी उपलब्ध करुन देण्यावर शासनाने भर दिला. कृषि महोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक शेती उत्पादनासाठी आणि निर्यातक्षम शेतीसाठीही विशेष प्राधान्य दिले आहे. या महोत्सवातून शेतकऱ्यांना शेतीचे धोरण, परवडणारी शेती, बाजारपेठा आणि शेतीतील तंत्रज्ञान यांची सर्व माहिती उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार ही क्रांतीकारी योजना हाती घेतली. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने ठिबकबरोबरच जलयुक्त शिवार अभियान, पिकांना हमीभाव, आधारभूत किंमत, उसासाठी एफआरपी अशा सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. या महोत्सवाचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून शेती क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.