न्युमोनिया बरा करण्यासाठी नवजात अर्भकाच्या अंगावर टाकले अॅसिड

राजस्थान : वृत्तसंस्ठा

सवाई माधोपूर येथे नवजात अर्भकाचा न्युमोनिया बरा करण्यासाठी चक्क त्याच्या अंगावर अॅसिड टाकण्यात आल्याचा धक्कादायक  प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

हे बाळ एका महिन्याचे असून या बाळाला न्युमोनिया झाल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी २६ मार्चला त्याला उपचारासाठी विनोबा वस्ती येथे नेले. तेथे एका बोगस डॉक्टरने उपचाराचा भाग म्हणून बाळाच्या अंगावर अॅसिडचा उपयोग केला. त्यामुळे बाळाच्या छातीवर व पायांवर जखमा झाल्या. विनोबा वस्तीतील उपचारानंतर बाळाची तब्येत जास्तच गंभीर झाली. त्यानंतर बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी शेजारील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांना बाळाच्या अंगावर जळाल्याच्या खुणा आढळून आल्या.

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात एका अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी के.सी. वर्मा यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या बाळाला भेट दिली. तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकू नये, अशीही विनंती केली. पोलीस अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेची चौकशी करत आहे.