पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणाऱ्या उद्योगपतीला अटक

पणजी : वृत्तसंस्था
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या अमेरिकत उपचार सुरु असताना दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवणाऱ्या एका उद्योजकाला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल फेसबुकवरुन अफवा पसरवणा-या एकाला वास्कोतून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव केनेथ सिल्वेरा असे असून ते उद्योगपती असल्याचे समजते आहे. सिल्वेरा यांनी पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सिल्वेरा यांनी पर्रिकर आणि भाजपासरकार विरोधात सोशल मीडियावरुन टिका सुरू केली होती.
पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल बुधवारी सिल्व्हेरांनी चुकीची माहिती फेसबुकवर शेअर केली, आणि समाजात अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने सिल्वेरा यांना अटक केली.

मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. आतापर्यंत दोन टप्पात त्यांच्यावर उपचार झाले आहेत. तिस-या टप्पातील उपचार येत्या सोमवारी त्यांच्यावर सुरु होणार आहेत. त्यानंतर डाॅक्टरांच्या सल्लाने ते गोव्यात परत येतील. अशी माहिती भाजप आमदार नीलेश काब्राल यांनी दिली.