पश्चिम महाराष्ट्रातील उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामधील तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे उन्हाचा तडका आणि उष्ण वाऱ्यांचा मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे प्रत्येक वर्षी होणाऱ्या उष्माघाताला आता सुरुवात होताना दिसत आहे शहरातील पत्रकारनगरमध्ये शंभर फुटी रस्त्यावरील एका वाहनाच्या शोरूमसमोर उन्हाच्या तडाख्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पश्चिम महाराष्ट्रातील उष्माघाताचा पहिला बळी सांगली शहरात गेला आहे.याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिभा उल्हास धनवडे (वय 61, रा. अरिहंत कॉलनी, पत्रकार नगर, सांगली) असे मृत महिलेचे नाव असून , त्या गेल्या आठ वर्षांपासून जावई दीपक निकम यांच्याकडे वास्तव्यास होत्या. तर त्यांचा मुलगा कळे (जि. कोल्हापूर) येथे राहतो. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या भाजी आणण्यासाठीमंडईत गेल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास त्या घराकडे परतत असताना शंभर फुटी रस्त्यावरील एका वाहनाच्या शोरूमसमोर आल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली त्यामुळे त्या भोवळ येऊन खाली पडल्या.

बराचवेळ त्या त्याच अवस्थेत तेथेच पडून होत्या. त्यानंतर नागरिकांनी त्यांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा अहवाल रात्री उशीरापर्यंत प्राप्त झाला नसल्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. एप्रिलमध्ये जिल्ह्याचा पारा चाळीस अंशाच्या वर गेला आहे. दुपारी बारानंतर रस्ते अक्षरशः ओस पडत आहेत. उष्माघातानेच प्रतिभा धनवडे यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उष्माघाताचा जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे.

दरम्यान राज्यातील उष्मघाताचा पहिला बळी जळगावमध्ये गेला होता .