भारतात सर्वसामान्यांसाठी आलिशान मोटारींची निर्मिती करणार : उद्योजक टेनिनो लॅम्बॉर्घीनी

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन
”भारत एक विकसनशील आणि वेगाने आर्थिक क्षेत्रात प्रगती करणारा देश आहे. या देशात युवकांसाठी मोठ्या संधी आहेत. भविष्यात भारतात गुंतवणुक करून येथील सर्वसामान्यांसाठी आलिशानमोटारींची निर्मिती करणार,” असल्याचे मत इटलीतील प्रसिद्ध उद्योजक आणि लॅम्बॉर्घीनी मोटार ब्रँडचे मालक टेनिनो लॅम्बॉर्घीनी यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर यांच्यातर्फे आयोजित दुसऱ्या पर्सोना फेस्ट 2018 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयटी इन्स्टीट्यूट ऑफ ग्रुपचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, मीटकॉमच्या संचालिका प्रा. सुनीता मंगेश कराड, लम्बोर्घीनी कार ब्रँडचे उपाध्यक्ष आणि टेनिनो लॅम्बॉर्घीनी यांचा मुलगा फिरुशियो लॅम्बॉर्घीनी, इटलीतील प्रसिद्ध गायिका आणि टेनिनो लॅम्बॉर्घीनी यांची मुलगी जिनेवरा लॅम्बॉर्घीनी, प्रसिद्ध अभिनेत्री क्लेरिसा बर्ट, जागतिक स्तरावरील प्रसिद्ध लेखक ग्रेग. एस. रीड, प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार हरीहरन, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मॉक जावडेकर, इफ्तिकार पठाण, फॅशन डिझाईनर निवेदिता सबू, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील राय उपस्थित होते.

इटलीतील प्रसिद्ध उद्योजक आणि लॅम्बॉर्घीनी कार ब्रॅण्डचे मालक टेनिनो लॅम्बॉर्घीनी म्हणाले की,”भारताची आर्थिक वाटचाल जगाला दिशा देणारी आहे. त्यामुळे या देशात युवकांना अनेक संधी आहेत. भारत गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा देश आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी गुंतवणुक करण्याचा आमचा विचार आहे. विकशनशील देशाच्या विकासात आम्ही सहभागी व्हावे, असा विचार आहे. येथील समाजाच्या आर्थिक आणि इतर बाबींच्या विकासासाठी पुढाकार घेऊन त्यांना चांगली जीवनशैली द्यावी, यासाठी प्रयत्न असणार आहे. तसेच येथील सर्वसामान्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी लवकरच सर्वांना परवडणाऱ्या किंमतीची मोटारींची निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

“लहानपणी काहीतरी वेगळे करायचे म्हणून डिझाईनकडे वळलो. त्याचा एक जागतिक स्तरावरील बँड झाला. त्यामुळे तरुणांनी भविष्यात आपल्या कल्पनांना मृत रुप देण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपले प्रगती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इटलीतील प्रसिद्ध गायिका आणि टेनिनो लम्बोर्घीनी यांची मुलगी जिनेवरा लम्बोर्घीनी म्हणाल्या की, मी एक गायक आहे. संगीत माझ्यासाठी आत्मा आहे. भारतीय संगीत शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात भारतातील संगीत क्षेत्रातील काही लोकांसोबत काम करण्याची इच्छा आहे. नवतरुणांनी आपल्या स्वप्नांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करावा, उंच भरारी घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन देत राहील.

लॅम्बॉर्घीनी ब्रँडचे उपाध्यक्ष आणि टेनिनो लॅम्बॉर्घीनी यांचा मुलगा फिरुशियो लॅम्बॉर्घीनी म्हणाले की,”माझ्या वयाच्या 27 व्या वर्षी माझ्या वडीलांना माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे. मन कधीही कमकुवत होऊ देऊ नका. भारतासारख्या विकशनशील देशात यशस्वी होण्यासाठी अनेक संधी आहेत. त्यांची योग्य निवड करून मेहनत करत रहा, यश नक्कीच मिळेल. सध्याचे जग अफाट वेगाने बदलत आहे. त्यानुसार तरुणांनी आपल्या कार्यशैलीत बदल करून कामाला सुरुवात करावी. कोणतेही काम करण्याची जबाबदारी खांद्यावर घ्या, मग बघा यश तुमच्या मागे धावेल,”असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संगीतकार आणि गीतकार हरीहरन म्हणाले की,”तरुण हे देशाचे भविष्य आहे. त्यांना आतापासूनच आपल्या करिअर विषयी गांभीर्याने विचार करावा. संगीत ही ईश्वराची देण आहे. ते तुमचे मन निर्मळ करते.”

अभिनेत्री क्लेरिसा बर्ट म्हणाल्या की,”भारतात गेल्या 14 वर्षात झपाट्याने बदल होत आहे. येथील तरुण कलाकारांसाठी काम करण्याची इच्छा आहे. ती लवकरच पूर्ण होईल. जागतिक स्तरावरील प्रसिद्ध लेखक ग्रेग. एस. रीड म्हणाले की, तुमचे ध्येय ठरवून त्याच्या मागे पळत राहा. जोपर्यंत तुमचे स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत शांत बसू नका” असा कानमंत्र ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की,”तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नवतरुणांचे मार्गदर्शन आणि युवकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गेल्या वर्षापासून हा फेस्टीवल सुरू केला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताचे भविष्य घडविताना गती आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवायचे आहेत. लोकांची गरज ओळखून त्यानुसार वाटचाल केल्यास जीवनात यश हमखास मिळते.”

सशक्तीकरणासाठी प्रसिद्ध अभिनेत्री क्लेरिसा बर्ड आमच्या सोबत काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, इटालीतील प्रसिद्ध उद्योजक आणि लॅम्बॉर्घीनी कार ब्रॅडचे मालक टेनिनो लॅम्बॉर्घीनी लेजंड ऑफ डिझाईन, प्रसिद्ध अभिनेत्री क्लेरिसा बर्ट आणि प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार हरीहर यांना सेलिब्रिटी ऑफ एमिनन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.