मक्का मशीद बॉम्बस्फोट निकालानंतर न्यायाधीशांचा राजीनामा

हैद्राबाद : वृत्तसंस्था

मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज (सोमवार) निकाल दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश रवींदर रेड्डी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे चर्चेला उधाण आले असून, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना ‘वैयक्तिक कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे’ सांगत राजीनामा पाठवला आहे.

मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी स्वामी असीमानंद व ईतर चार आरोपींची आज पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मे २००७ मध्ये मक्का मशिदीत झालेल्या स्फोटात ९ जण ठार तर ५८ जखमी झाले होते. या प्रकरणी दहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांना अटक करून त्यांच्यावर खटला भरला होता. आज याप्रकरणाचा निकाल दिला गेला. या निकालाच्या काही तासानंतर लगेचच या प्रकरणाचा निकाल देणारे न्यायाधीश रविंदर रेड्डी यांनी आपला राजीनामा मुख्य न्यायाधीशांकडे पाठविला आहे.

याप्रकरणाचा तपास पोलिसांनी केल्यानंतर तो सीबीआयकडं सोपवण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण २०११ साली एनआयए कडे सोपवण्यात आले होते.