महिलांच्या कर्करोगाचे निदान करण्यावर भर : गिरीष महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब असून या व्याधीला वेळीच नियंत्रित करण्यासाठी कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यात निदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्करोगाच्या प्राथमिक निदानासाठी शासकीय रूग्णालयात बाह्यरूग्ण विभाग सुरू होणे आवश्यक आहे. जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग जागृती शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त केले.

ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये मुंबईच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर ज.जी. समूह रूग्णालय येथे कर्करोग बाह्य रूग्ण विभागाचे उद्घाटन आणि कर्करोग जागृती शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर ज.जी. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर, उपअधिष्ठाता डॉ.विनायक काळे, डॉ.संजय सुरासे (वैद्यकीय अधीक्षक), मुख्य प्रशासकीय अधिकारी युवराज सोनवणे उपस्थित होते.

महाजन म्हणाले,”राज्यातील सर्व शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद होमिओपॅथी नर्सिंग महाविद्यालयात हे शिबिर आयोजित केले असून ३५२ महाविद्यालये सहभागी झालेली आहेत. या शिबिरात आजाराबाबत चर्चासत्रे, विविध स्पर्धा तसेच रोगनिदान शिबिराचे सर्व ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथे या निमित्ताने महिला व बाल महाआरोग्य शिबीर संपन्न झाले असून त्यात लाखो रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाद्वारे मागील वर्षी सर्व १६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग मशीन’ उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे हजारो महिलांची तपासणी करण्यात आली. या माध्यमातून बऱ्याच महिलांच्या कर्करोगाचे प्राथमिक टप्प्यावर निदान झाल्याने त्यांना तातडीने उपचार सुरु करणे शक्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सर ज. जी. समूह रूग्णालय येथे वैद्यकीय शिक्षण व बीएस.स्सी नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या ज्येष्ठ महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. महाजन यांनी स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.