मालदीवमध्ये माध्यमांची गळचेपी ; दोन भारतीय पत्रकारांना अटक

मालदीवमध्ये सध्या आणीबाणी घोषीत करण्यात आली असून या आणीबाणीत आता माध्यमांची गळचेपी सुरु झाली आहे. आत्तापर्यंत मालदीवमध्ये दोन भारतीय पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीसाठी वृत्तांकन करीत आहेत.
एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, अमृतसरच्या मनी शर्मा आणि लंडनमध्ये राहणारा मूळचा भारतीय पत्रकार आतिश रावजी पटेल या दोघांना मालदीवच्या सरकारने ताब्यात घेतले आहे. त्यांना मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना मालदीवचे खासदार अली जहीर म्हणाले की, आता येथे माध्यमांचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. इथल्या आणीबाणीच्या स्थितीचे वार्तांकन करणाऱ्या एका वृत्त वाहिनीचे प्रक्षेपणही काल रात्री बंद करण्यात आले. आम्ही या पत्रकारांच्या सुटकेची आणि देशात लोकशाही लागू करण्याची मागणी करीत आहोत. भारताचा शेजारी देश असलेला मालदीव सध्या राजकीय संकटात आहे.