रंगाचा बेरंग! विद्यार्थिनीवर शेंदूर टाकल्याने आठवीतील मुलाला अटक

गुरुग्राम : उत्तर भारतातील काही शहरांमध्ये बच्चेकंपनीची आजपासूनच धुळवडीला साजरी करत आहे. मात्र गुरुग्राममधील १४ वर्षांच्या मुलाला हा सण चांगलाच महागात पडला आहे. वर्गातील एका विद्यार्थिनीवर शेंदूर टाकल्याचा आरोप केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

गुरुग्राम येथील फारुखनगर येथे राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलाने सोमवारी त्याच्या वर्गातील एका मुलीच्या डोक्यावर शेंदूर टाकला. ते दोघेही शाळेतून परत येताना हा प्रकार घडला. घरी परतल्यावर मुलीने तिच्या पालकांना याबाबत माहिती दिली. “मुलाने जाणूनबुजून माझ्या डोक्यावर शेंदूर टाकला”, असा तिचा आरोप होता. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.

मुलाच्या कुटुंबीयांना या प्रकरणाने मानसिक धक्काच बसला आहे. पोलिसांच्या कारवाईवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “त्याच्या वयातल्या मुलांमध्ये धुळवडीची उत्सुकता असते. त्याने मुलीवर रंग टाकला. त्याने तिच्या डोक्यावर गुलाल टाकला होता. यामागे त्याचा वाईट हेतू नव्हतातक्या लहान मुलाला शेंदूरचे महत्त्व माहीती नाही,”असे मुलाच्या आईने सांगितले.

पोलिसांनी मुलाविरोधात पॉस्को कायद्या अंतर्गत कारवाई केली. “अशा कठोर कायद्याअंतर्गत कारवाई केल्याने माझ्या मुलाचे आय़ुष्य उद्ध्वस्त होईल,”अशी भीतीही त्याच्या आईने व्यक्त केली. सध्या त्या मुलाची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.