विमानप्रवाशाचे गहाळ झालेले पाकिट जवानाकडून परत

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर प्रवासादरम्यान प्रवाशाचे विसरलेले पाकिट केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने परत करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या जवानावर सर्वस्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर सोमवारी (१२ फेब्रुवारी) सकाळी अकराच्या सुमारास विमानाने दिल्लीला निघाले होते. विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षेच्या कारणासाठी प्रवाशांची तपासणी करण्यात येते. यावेळी खर्डेकर यांनी कोटातील पाकिट आणि कोट एका ट्रे मध्ये ठेवला. त्यावेळी गडबडीत खर्डेकर यांच्याकडून पाकिट गहाळ झाले. पाकिटात वीस हजारांची रोकड, एटीएम कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड असा मुद्देमाल होता. खर्डेकर जेंव्हा दिल्लीत पोहचले तेंव्हा आपले पाकिट हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब सहकारी वैभव पोमण, जयंत येरवडेकर याना या घटनेची माहिती दिली. येरवडेकर आणि पोमण यांनी विमानतळावरील आधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास विमानतळावरील आधिकाऱ्यांनी पाकिट मिळाले असून तुमची ओळख पटवून घेऊन जा, असा निरोप दिला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास खर्डेकर विमानाने पुण्यात पोहोचले असता जवानांनी त्यांचे पाकिट त्यांच्या हवाली केले. माझे पाकिट मुद्देमालासह व्यवस्थित परत केल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.

अनेक वेळा विमानतळावर गहाळ झालेल्या वस्तू जवानांना सापडतात. त्या वस्तू मूळ मालकाला देण्यासाठी प्रयत्न केले जातात. विमानतळावर गहाळ झालेल्या ८० टक्के वस्तू प्रवाशांना परत केल्या जाता असून ज्या वस्तूंचे मालक सापडत नाहीत. त्या वस्तू सरकारजमा केल्या जातात, असे ठाकूर यांनी सांगितले. या वेळी खर्डेकर यांनी केंद्रीय औद्याोगिक सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार यांचे आभार मानले.