शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव

पुणे: पोलिसनामा ऑनलाईन
नृत्य, घुंगरू, संगीत, ताल, लय यांचा मिलाफ असलेला 17वा शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात रविवार, 25 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजता संपन्न होत आहे. पवित्र भट व सहकारी यांचा ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ हा कार्यक्रम आणि नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य हे या महोत्सवाचे यंदाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सव समिती अध्यक्षा सबीना संघवी यांनी ही माहिती दिली.

शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर, डीव्हीडी एक्सप्रेस-औंध आणि दि ओ हॉटेल-कोरेगांव पार्क येथे 16 ते 24 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असतील. तसेच कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 11.00 वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी प्रवेशिका उपलब्ध असतील. प्रवेशिकेची किंमत रु. 250 असून प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था असेल. तसेच www.bookmyshow.com या वेबसाइटवर ऑनलाईन बुकींग करता येतील.

कार्यक्रमाचा प्रारंभ पवित्र भट व सहकारी यांच्या ‘श्रीरंगा द रिक्लाइनिंग लॉर्ड’ या नृत्याच्या कार्यक्रमाने होईल. पवित्र भट यांनी देशात आणि परदेशातही अनेक भरतनाट्यम् कार्यशाळा आयोजित केल्या. ‘श्रीरंगा’ या कार्यक्रमात एका भक्ताचा पवित्र कावेरी नदीपासून सध्याच्या तामिळनाडू राज्यातील श्रीरंगम् येथील रंगनाथस्वामीपर्यंतचा प्रवास सादर केला आहे. भक्ताने मंदिरात प्रवेश करताक्षणी गरूड त्याचे स्वागत करतो. हा सर्व नृत्याविष्कार कार्यक्रम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.

यानंतर नक्षत्र गुरुकुलाने सादर केलेले गोतिपुआ नृत्य सादर होईल. नक्षत्र गुरुकुलाची स्थापना त्याचे संस्थापक संचालक गुरु बिजय कुमार साहू यांनी 2007 मध्ये भुवनेश्वर येथे केली. ओडिसी डान्सचा पूर्वावतार असलेले गोतिपुआ नृत्य हे स्त्रियांची वेशभूषा व पोशाख केलेली मुले सादर करतात. गोतिपुआचा ओडिया भाषेतील अर्थ गोती म्हणजे मुलगी आणि पुवा म्हणजे मुलगा आहे. यात नर्तक अनेक गुंतागुंतीच्या बंध (मुद्रा) करतो.

उमेशचंद्र बरिक, सब्यसाची साहू, जगमोहन साहू, कुणाल प्रधान, अनंत जेना, अभिषेक साहू आणि पबित्रा साहू हे गोतिपुआ नृत्य सादर करणार आहेत. हे मनोहर नृत्य पाहण्याची संधी पुणेकरांना प्रथमच मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक पंचशील रिअ‍ॅलिटी हे असणार आहेत, तर 5 एफ वर्ल्ड, वेकफील्ड, मोर मिसचीफ, रेडिओ वन, दि ओ हॉटेल आणि प्युअर गोल्ड फाइन चॉकलेट हे या कार्यक्रमाचे सह प्रायोजक असतील.