सावधान….अमनोरा सिटीमध्ये ‘टायर किलर स्पीड ब्रेकर’

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

तुम्ही जर राँग साईड ने वाहन चालवत असाल तर मग ही बातमी वाचाचं. कारण राँग साईड ने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना रोखण्यासाठी अमनोरा सिटीमध्ये चांगलाच बंदोबस्त केला आहे. वाहन चालकाने राँग साईड ने गाडी चालवली की पंक्चर झाली म्हणून समजाच. पुण्यातील अमनोरा टाऊनशिप परिसरातील रस्त्यावर अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे. लोकांना वाहतूकीच्या नियमांची सवय लागावी व वाहतूकीच्या नियमांचे पालन करुन अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती अमनोरा सिटीचे सुनील तरटे यांनी दिली आहे.

अॅमनोरा सिटीमधील अॅमनोरा स्कुलच्या समोर हा टायर किलर स्पीड ब्रेकर लावण्यात आला आहे. तुम्ही जर योग्य मार्गाने जात असाल तर तुमची गाडी या स्पीड ब्रेकवरुन गेली तरी ती पंक्चर होणार नाही. मात्र राँग साईडने आलात की गाडी पंक्चर होणार. स्प्रिंगच्या साह्याने हे उपकरण काम करते. जर हा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग यशस्वी झाला तर संपुर्ण पुणे शहरात असा प्रयोग राबविण्याची विनंती पुणे शहर वाहतूक शाखेला करण्यात येणार असल्याचेही सुनील तरटे म्हणाले.

अमनोरा टाऊनशिप परिसरातील रस्त्यावरून राँग साईडने येणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी ‘टायर किलर स्पीड ब्रेकर’ बसवण्यात आले आहेत. अमनोरा स्कूल समोरील रस्त्यावरून राँग साईड येणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. या अपघातांना आळा घालण्यासाठीच प्रायोगिक तत्वावर येथील रस्त्यावर ‘टायर किलर स्पीड ब्रेकर’ बसवण्यात आले आहेत. या प्रयोगामुळे अमनोरा स्कूलसमोरील होणाऱ्या अपघाताचे प्रमाण मोठ्याप्रमाणात कमी झाले आहे. तसेच लोकांना या मार्गावरुन प्रवास करताना वाहतूकीचे नियम पाळण्याची सवय देखील लागली आहे. अनेक देशामध्ये अशा टायर किलर स्पीड ब्रेकरचा वापर केला जातो. मात्र पुणे शहरात प्रथमच खाजगी रस्त्यावर हा प्रयोग राबविण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी गाडी चालविताना जरा जपूनच.