हिमस्खलनात तीन जवान शहीद

कुपवाडा : काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हिमस्खलनात तीन जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. माछिल भागातील लष्कराच्या तळावर बर्फाचा डोंगर कोसळल्याने जवानांचा मृत्यू झाला आहे. कमलेश सिंह (वय ३९), नाईक बलवीर (३३) आणि राजिंदर (२५) अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.
अफगाणीस्थानात बुधवारी ६.२ रिश्टर स्केल क्षमतेचा शक्तीशाली भूकंप झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-काश्मीरच्या अनेक जिल्ह्यात हिमस्खलनाचा इशारा सरकारी यंत्रणांनी दिला होता. या भूकंपाचा सर्वाधिक फटका बारामुल्ला जिल्ह्याला बसू शकतो तर कुपवाडा, बंदिपोरा, शोपियान आणि कारगील भागाला कमी धोका असल्याचे यंत्रणांनी सांगितले होते.

यापूर्वी,पाच जानेवारीला झालेल्या एका हिमस्खलनात कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार भागात स्थानिक अडकले होते. या अडकलेल्या लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतून एका आठ वर्षांच्या मुलाला आणि ५० वर्षांच्या व्यक्तीला वाचवण्यात आले होते. सर्वजण आपल्या खासगी वाहनाने या भागातून प्रवास करीत होते. या हिमस्खलनाच्या दुर्घटनेत बीआरओचा एक अभियंता आणि आठ स्थानिकांचा समावेश होता.