हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून 29 जणांचा मृत्यू

कांगडा (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील चेली गावाजवळ तब्बल 200 फूट दरीत स्कूल बस कोसळून 29 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तब्बल 27 मुले आणि इतर दोघांचा समावेश आहे. तर 10 मुले जखमी असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

बजीर राम सिंह पठानिया मेमोरियल स्कूलच्या या बसमध्ये एकूण 40 मुले होती. यापैकी तब्बल 27 मुलांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी पोहचली असून जखमी मुलांना बाहेर काढले आहे. शाळेतून मुलांना घरी सोडण्यासाठी जात असताना ही बस १०० फूट खोल दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, बसचा वेग जास्त असल्याने चालकाचं त्यावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट दरीत कोसळली अशी प्राथमिक माहितीही समजते आहे.