सातवा वेतन आयोग : ‘या’ दिवशी दीड लाख अधिकारी जाणार सामुदायिक रजेवर

मुंबई : वृत्तसंस्था – सातव्या वेतन आयोगासंबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्व खात्यातील अधिकारी येत्या 5 जानेवारीला सामुदायिक रजेवर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाकडून मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सामुदायिक रजा आंदोलन होणार असल्याने राज्यातील जनतेला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या एका दिवसाच्या सामुदायिक रजा आंदोलनात दीड लाख अधिकारी रजेवर जाणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आला आहे.

अद्याप सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. यामुळे सातवा वेतन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी आग्रही असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता राजपत्रित अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू व्हावा, केंद्र सरकारप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा असावा आणि सेवानिवृत्तीची मर्यादा वाढवून 60 वर्षे करण्यात यावी तसंच रिक्त पदं भरण्यात यावी या मागण्यांसाठी राज्यातील सर्वच खात्यातील अधिकारी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.