‘तो’ निर्णय तातडीने रद्द करा, गोंदिया जिल्ह्यातील 109 शाळांनी पुकारला संप

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 11 डिसेंबर 2020 रोजी काढलेल्या शासन निर्णयाचा निषेध करीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात चेष्ठा करणारा काळा निर्णय तातडीने रद्द करावा. या मागणीसाठी जिल्ह्यातील माध्यमिकच्या 371 पैकी 109 शाळा शुक्रवारी (दि. 18 ) बंद ठेवण्यात आल्या होत्या. शासनाने हा निर्णय रद्द न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे.

राज्यातील खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानीत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी 7 मार्च 2019 च्या निर्णयानुसार सुधारित आकृतीबंध लागू करण्यासाठी शासनाने 5 सदस्यीय समिती स्थापन केली होती. त्या समितीने विविध संघटनांकडून अभिप्राय मागवले होते. त्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला नसताना देखील 11 डिसेंबर रोजी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात विद्यार्थी पटसंख्या विचारात घेवून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे निर्धारित करुन प्रतिमाह भत्ता बेठबिगारी प्रमाणे जाहीर केला.

तसेच नियुक्ती संदर्भात नवीन आकृतीबंध काढून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची चेष्ठा मांडून वेठबिगारी समजण्याचे धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज्य शासनाने काढलेल्या या काळ्या निर्णयाचा निषेध करुन हा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष गुनेश्वर फुंडे यांनी दिला आहे.