एकाच घरात सापडले ११ मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  

उत्तर दिल्लीतल्या बुरारी भागात एका घरात लटकलेल्या अवस्थेत ११ मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दोन कुटुंबातील ११ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे प्रकरण आत्महत्येचे आहे की सामूहिक हत्येचे याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना याची सकाळी साडेसातच्या सुमारास माहिती मिळाली. फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी पोहचली असून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

मृत्युमुखी पडलेली व्यक्ती या दोन भावांच्या कुटुंबातील असून, मृतांमध्ये ७ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील एक जण प्लायवुडचा धंदा करत होता, तर दुसऱ्याचे किराणा मालाचे दुकान होते.

अद्यापही या ११ जणांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आत्महत्या करण्याचे कारण काय असेल, याचाही पोलीस शोध घेत आहेत. बुरारीच्या ज्या परिसरात हे मृतदेह सापडले आहेत, तिथे लोकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळीच अशा प्रकारची घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.