COVID-19 : ‘कोरोना’ व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची भिती, दिल्ली एयरपोर्टवर 11 प्रवाशी पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे परदेशातून येणार्‍या प्रवाशांची दिल्लीच्या अंतरराष्ट्रीय इंदिरा गांधी एयरपोर्टवर सतत तपासणी सुरू आहे. याच दरम्यान ब्रिटनहून दिल्ली विमानतळावर आलेल्या 11 प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाला दुजोरा मिळाला आहे. याबाबत जेनिस्ट्रिंग्ज डायग्नोस्टिक सेंटरच्या संस्थापक गौरी अग्रवाल यांनी सांगितले. दिल्ली विमानतळावर सर्व प्रवाशांची कोरोना व्हायरस तपासणी करण्याचे काम जेनिस्ट्रिंग्ज डायग्नोस्टिक सेंटरला देण्यात आले आहे.

याशिवाय जेनिस्ट्रिंग्ज डायग्नोस्टिक सेंटरच्या संस्थापक गौरी अग्रवाल यांनी सांगितले की, चार उड्डाणांमधील 50 प्रवाशांना विलगिकरणात पाठवले आहे. ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना व्हायरस आढळल्यानंतर सरकारने सोमवारी आदेश दिला होता की, ब्रिटनहून येणार्‍या सर्व प्रवाशांची भारतीय विमानतळावर तपासणी करण्यात यावी. अग्रवाल यांनी म्हटले की, निर्देशानंतर ब्रिटनहून एकुण चार उड्डाणे दिल्लीत आली आहेत.

अग्रवाल यांनी सांगितले की, इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-थ्री टर्मिनलवर आमच्या प्रयोगशाळेत लंडनहून आलेल्या 950 पेक्षा जास्त प्रवाशांचे नमूने तपासण्यात आले आणि त्यापैकी 11 मध्ये संसर्ग आढळून आला.

जेनिस्ट्रिंग्ज डायग्नोस्टिक सेंटरच्या गौरी अग्रवाल म्हणाल्या 11 नमूने सुरक्षित ठेवले असून ते जीनोम अनुक्रमणासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रात (एनसीडीसी) पाठवले जातील. सध्या आम्हाला ही माहिती नाही की, हे लोक नव्या प्रकारच्या व्हायरसने संक्रमित आहे किंवा नाहीत.