डॉ. पोळ पिस्तूलप्रकरण : कारागृहातील १४ कर्मचारी निलंबित

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन –  वाईतील सिरियल किलर व  कैदी डॉ. संतोष पोळ याच्याकडे कारागृहात पिस्तूल असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर हे पिस्तूल खोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. डॉ. पोळ यानेच हा सर्व प्रकार घडवून आणल्याचेही समोर आले. यामुळे कारागृहात डॉ. पोळ यास मोबाईल उपलब्ध झाल्याचे उघड झाल्याने सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा, कैद्यांना मोबाइल उपलब्ध करुन देण्यास मदत करणाऱ्याबरोबरच कामात कचुराई केल्याचा ठपका ठेवत कळंबा कारागृहातील हवालदार, सुभेदारांसह एकूण १४ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. अप्पर कारागृह महासंचालकांनी राजवर्धन यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

वाईतील सीरियल किलर आणि कळंबा कारागृहातील कैदी डॉ. संतोष पोळ (रा. धोम. ता. वाई) याला मोबाइल पुरविल्याच्या संशयावरुन प्रशासनाने ही कारवाई केली आहे. न्यायालयीन कोठडीतील कैदी डॉ. पोळने कारागृहात खोटे पिस्तूल तयार करून २७ नोव्हेंबरला व्हॉट्स अ‍ॅपवरुन क्लिप व्हायरल केली होती. त्यामुळे कळंबा कारागृह प्रशासन हडबडले होते. पोळकडे केलेल्या चौकशीत हे पिस्तूल खोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी संशयित दहा ते पंधरा जणांची चौकशी करुन अहवाल तयार केला होता. तो अप्पर कारागृह महासंचालक राजवर्धन यांच्याकडे सादर केला होता. शुक्रवारी रात्री त्यांनी निलंबित कर्मचाऱ्यांची माहिती लखोट्यातून उपमहानिरीक्षक साठे यांच्याकडे पाठविली. शनिवारी सकाळी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेश दिले जाणार आहेत. या प्रकरणी कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी या कारवाईला दुजोरा दिला.

सध्या पोळची रवानगी येरवडा येथील कारागृहात झाली आहे. साठे यांनी केलेल्या चौकशीत कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोळच्या बरॅककडे जाणाऱ्या पंधरा कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती. सुरक्षारक्षक पवारने पोळला छुप्या मार्गाने मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सुरक्षारक्षक राकेश शिवाजी पवार (३०, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) याला तडकाफडकी निलंबित केले होते. या प्रकरणी निलंबितांची संख्या १५ झाली आहे.