सोशल मीडियावर 14 हजार फेक पोस्ट, 400 जणांवर कारवाई; सायबर पोलिसांची कारवाई

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अलीकडच्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून आमिष दाखवत फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात तर या पोस्टच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. आता पोलिसांच्या सायबर विभागाने लॉकडाऊन काळातील सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या १४ हजार फेक पोस्ट शोधून काढल्या आहेत. आता पर्यंत ४०० जणांवर गुन्हा नोंद केला असून १०० हुन अधिक जणांवर कारवाई केली आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, दिशा सालियन प्रकरणाच्या निमित्ताने समाजमाध्यमांवर असंख्य बनावट खाती तयार करून त्याआधारे खोटी, चुकीची, बदनामी करणारे साहित्य हेतुपुरस्सर पसरवून राज्य सरकार, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु होता असा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे नोंदवून बनावट खाती हाताळणाऱ्या, बदनामी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते. त्या वेळी ८० हजारांहून अधिक बनावट खाती समोर आली. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मोठ्या प्रमाणात बनावट खात्यांचा वापर
फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बनावट खात्यांचा वापर केला जात असल्याचे समाेर आले. नुकताच एंजल प्रिया नावाचा ट्रेंड दिसून आला. यात मुले ही मुलगी असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याचे सायबर विभागाच्या तपासात समोर आले. अनेक फेक पोस्ट ज्या अकाउंटवरून समाजमाध्यमामध्ये व्हायरल करण्यात आल्या ती खातीही फेक असल्याचे दिसून आले आहे.