सर्दी-खोकला ते हृदयरोग, ‘या’ अनेक समस्यांवर गुणकारी ठरतो कांदा ! जाणून घ्या ‘हे’ 18 मोठे फायदे

पोलिसनामा ऑनलाईन –  भाजी कोणतीही असो त्यात कांद्याचा वापर होतोच. जेवणाची चव वाढवणाऱ्या कांद्यात ( onion ) अनेक औषधी गुणधर्म आहेत. आज आपण याच गुणधर्मांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) कांदा हा तिखट, अग्निदीपक, रुचकर, कफोत्सारक, उत्तेजक, मूत्रल, कमोद्दीपक असा बहुगुणी आहे. कांद्यात कॅल्शियम, अ‍ॅल्युमिन, लिग्नीन, अ, ब, क जीवनसत्व, गंधक, फॉस्फोरिक आम्ल, तंतुमय पदार्थ स्निग्धता असे अनेक औषधी गुणधर्म आहेत.

2) लघवी थेंब थेंब होत असेल किंवा लघवी करताना जळजळ होत असेल तर एक कांदा अर्धा लिटर पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर प्यावं. यामुळं लघवीची जळजळ थांबून लघवी साफ होते.

3) त्वचा सुंदर होण्यासाठी तिळाच्या तेलात कांद्याचा रस घालून उकळून ते तेल नियमितपणे अंघोळीपूर्वी 10 मिनिटे त्वचेवर लावावं.

4) कच्चा कांदा खाल्ल्यानं तोंडातील चिकटपणा नाहीसा होतो. तोंड व दात स्वच्छ करण्याचे काम कांदा करतो. कांदा खाल्ल्यानं स्मरणशक्ती वाढते.

5) जिरे आणि सैंधव घालून कांद्याची कोशिंबीर करून खाल्ली तर घशात साचलेला कफ दूर होऊन घसा स्वच्छ होतो.

6) हृदयरोग, अतिरक्तदाब आणि हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.

7) मधमाशीच्या दंशानं आग होत असेल तर दंशाच्या ठिकाणी कांद्याचा रस चोळल्यास तेथील दाह कमी होतो.

8) जुलाब, उलटी, मळमळ, अपचन अशा विकारांमध्ये कांदा आणि पुदीना समप्रमाणात घेऊन त्याचा रस तयार करून त्यात थोडं सैंधव मीठ घालावं आणि हे मिश्रण प्यावं.

9) ग्रीष्म (उन्हाळा) ऋतुचा त्रास होऊ नये म्हणून या ऋतुत कांद्याचा वापर आहारात जास्त प्रमाणात करावा. या ऋतुत कांदा भाजून खाणं किंवा इतर पदार्थांसोबत खाणं हे सर्वच चांगलं आहे. परंतु कच्चा कांदा खाणं हे अधिक लाभदायक असतं.

10) कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे.

11) कांद्याचं ताजं लोणचं बनवून खाल्लं तर तोंडाला चव येते. अग्नि प्रदीप्त होऊन अन्नपचन होतं.

12) दमा, सर्दी, खोकला हे आजार वाढल्यास तसंच छातीत कफ झाला असेल तर कांद्याचा रस, मध आणि आलं यांचं चाटण दिवसातून 2-2 वेळा घ्यावं.

13) चेहरा कांतीयुक्त, सतेज दिसण्यासाठी तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी दोन चमचे कांद्याचा रस, दोन चमचे काकडीचा रस आणि एक चमचा मध यांचं मिश्रण करून ते चेहऱ्यावर लावावं. नियमित हे मिश्रण जर चेहऱ्याला लावलं तर सुरकुत्या नाहीशा होतात.

14) कांदा ठेचून त्याचा रस आणि पाकळी जखमेवर लावल्यास जखम त्वरीत भरून निघते.

15) उन्हाळ्यात उन्हापासून त्रास कमी व्हावा म्हणून बाहेर पडताना डोक्यावर कांद्याच्या ताज्या पाकळ्या ठेवून त्यावर किंचित ओलसर स्कार्फ बांधून बाहेर पडावं. यामुळं डोक्याला शीतलता प्राप्त होऊन उन्हाचा त्रास कमी होतो.

16) कांद्याचा औषधी म्हणून उपयोग करताना त्याचा रस काढून तो हवाबंद बाटलीत ठेवावा आणि उन्हातून आल्यानंतर किंवा मधुमेहामुळं तळहात आणि पायांची आग होत असेल तर तो रस लावावा. यामुळं उष्णतेचा त्रास कमी होऊन आग कमी होते.

17) कांदा ठेचून तो पाण्यात उकळून काढा करावा. हा काढा दोन चमचे घेऊन त्यात अर्धा चमचा मध घालावा. हे मिश्रण रात्री झोपाना पिलं तर चांगली झोप लागते.

18) कांद्यासोबत गूळ मिसळून जर मुलांना खायला दिला तर त्यांची वाढ लवकर होऊन उंची वाढते.

हेही लक्षात असू द्या

कांदा कापल्यानंतर त्याचा लगेचच वापर करावा. जास्त वेळ कापून ठेवलेला कांदा खाऊ नये. तसंच कांदा खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंध येऊ नये यासाठी आल्याचा तुकडा, लवंग किंवा गुळाचा खडा चघळावा. किंवा थोडा ओवा आणि बडीशेप खावी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.