पुण्यात आंदोलनात १८५ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी आयोजित महाराष्ट्र बंदला पुण्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले असून त्यात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत १८५ जणांना अटक केली आहे. चांदणी चौकातील नियोजित रोको आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर समाजकंटकांनी झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यावर टाकून तो अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली असून, त्यात ५  पोलीस जखमी झाले व २ पोलीस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. या ठिकाणी आंदोलनात शिरलेल्या समाजकंटकांनी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण पौड रोड व बंगलोर – मुंबई महामार्ग रोखून धरला होता. पौड रोडवर सुरु असलेल्या मेट्रो कामासाठी लावलेले बॅरिकेट रस्त्यावर आडवे टाकून पौड फाट्यापासून चांदणी चौकापर्यंतचा रस्ता ठिकठिकाणी बंद केला होता. पोलिसांनी ते हटविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर दगडफेक करुन आंदोलक पौड रोडवरील गल्ली बोळात पळून जात होते़ त्यातील काही जणांना पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतले. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक केली गेली तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज केला. त्यानंतर अश्रुधूराची नळकाड्या फोडून दंगल करणाऱ्या जमावाला पांगविले व महामार्गावरील वाहतूक सुरु केली. दगडफेक करणाऱ्यांपैकी काही जणांनी आपली ओळख लपविण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ८३ जणांना ताब्यात घेतले होते.

[amazon_link asins=’B07DNZLGFL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’01640524-9c57-11e8-b732-49005f774d7a’]

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार संयोजकांनी दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कार्यकर्त्यांना निघून जाण्याचे आवाहन केले व आंदोलन संपल्याचे जाहीर केले. नंतरही काही समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेट व संरक्षण भिंतीवरुन आत येण्याचा प्रयत्न केला. तेथील सुरक्षा केबिनची काच फोडली. या घटनेत रात्री ५ महिला व ७६ पुरुषांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी प्रतिकार केल्याने त्यांच्यावर सौम्य लाठीमार करण्यात आला.

डेक्कन जिमखाना परिसरातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्यानंतर अनेक आंदोलकांनी सायंकाळी खंडोजी बाबा चौकात ठिय्या मारला रस्ता रोको केला. अशा २१ जणांना ताब्यात घेण्यात आले. पिंपरी चिंचवड येथेही अनेक ठिकाणी आंदोलने शांततेत पार पडली़ बंदच्या काळात संपूर्ण दिवसभर पुणे शहर व पिंपरी चिंचवडमध्ये ६ हजार २५० पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अटक केलेल्या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांचा या आंदोलनातील सहभागा विषयी चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी आम्ही ठिय्या आंदोलन संपल्याचे जाहीर केल्यानंतर काही जणांनी तोडफोड केली असून त्यानंतरही तेथे घोषणाबाजी करीत ते ठाण मांडून बसले होते. त्यांचा आणि सकल मराठा समाजाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.