दुर्दैवी ! वाघिणीसह 2 बछडे आढळले ‘मृतावस्थेत’

नागपूर, पोलीसनामा ऑनलाईन : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत (pench tiger reserve project) अभयारण्यात काल कॉलरवाल्या वाघिणीसह त्या वाघिणीचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. दरम्यान असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की या वाघिणीवर विषप्रयोग करण्यात आला आहे.

या वाघिणीसह तिचे दोन बछडे 1 जानेवारी रोजी शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे या वाघिणीच्या बाजूला एक गाईचे मृत वासरू देखील आढळून आले आहे.

दरम्यान असे सांगितले जात आहे की या वाघिणीचा मृत्यू विषबाधेने झाला आहे. या घटनेसंदर्भात एका शेतमालकाला अटक करण्यात आली असून एकाच वेळी वाघिणीसह तिचे दोन बछडे मृत अवस्थेत आढळून आल्याने वनविभागाचे धाबे दणाणले आहे.

वनअधिकाऱ्यांनी घटनेचा तपास केला असता असा संशय व्यक्त केला आहे की ही घटना 3 दिवसांपूर्वी घडली असावी. तपासादरम्यान आढळून आले की या वाघिणीला तीन बछडे असून दोघांचा मृत्यू झाला आहे आणि तिसऱ्या बछड्याचा शोध घेतला जात आहे.