दुर्दैवी ! FB Live करणे बेतले जीवावर, होडी उलटून दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – मौजमजा अन् मस्ती करताना फेसबुक लाईव्ह करणे तरुणांच्या जीवावर बेतले आहे. फेसबुक लाईव्ह करताना होडी उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीआहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील मॅरिटार गावात रविवारी (दि. 21) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

अनुज गुप्ता आणि दीपक गुप्ता (रा. मॅरिटार, जि. बलिया) अशी मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅरिटार गावातील 6 तरुण रविवारी दुपारी एक छोटी होडी घेऊन सुरहा डोहातील पाण्यात उतरले होते. होडी चालक नसल्याने तरुण स्वत:च होडी चालवत होते. मौजमजा आणि मस्ती सुरू असतानाच त्यांनी फेसबुक लाईव्ह केले होते. या दरम्यान होडीवरचे त्यांचे नियंत्रण सुटल्याने होडी पाण्यात उलटली. होडी उलटल्याने सर्वजण पाण्यात पडले. त्यांनी वाचवण्यासाठी जोरजोरात आरडा-ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेल्या काही मच्छीमारांनी आपला जीव धोक्यात टाकत या तरुणांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. सहाही तरुणांना त्यांनी पाण्यातून बाहेर काढले. मात्र यातील अनुज आणि दीपक गुप्ता या दोघांची स्थिती गंभीर असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासण्यापूर्वीच मृत घोषित केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.