जुन्नर तालुक्यात अज्ञात आजाराने 200 कोंबड्या दगावल्या, 10 KM चा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पुणे जिल्ह्यात बर्डफ्लूने शिकावं केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रविवारी जुन्नर तालुक्यातील येडगाव (ता.जुन्नर) येथील गणेशनगर शिवारातील देशी कुक्कुटपालन फार्ममधील दोनशे कोंबड्या अज्ञात आजाराने मृत दगावल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचा रोग निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत येडगाव शिवारातील दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर रविवारीपासून सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्याचे तहसिलदार हनुमंत कोळेकर  यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती देताना जुन्नर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एम.ए. शेजाळ म्हणाले, गणेशनगर येथील देशी कुक्कुटपालन फार्ममध्ये दोन हजार देशी कोंबड्या आहेत त्यापैकी रविवारी सुमारे दोनशे कोंबड्या अज्ञात आजाराने मृत झाल्या. हि घटना समजताच घटनस्थळाची पाहणी केली. सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपळा येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोगनिदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल बुधवार (ता.२७) पर्यंत प्राप्त होईल. रोग निदान अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोंबड्यांच्या मृत्युचे निदान होईल.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी येडगाव शिवारातील दहा किलोमीटर पर्यंतचा परिसरात रविवारपासून सतर्क क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

यामुळे या क्षेत्राच्या ठिकाणी पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य आणि अनुषंगिक साहित्य, उपकरणे आदींची वाहतूक करण्यास मनाई केली आहे. तसेच पोल्ट्री परिसरात नागरिकांच्या हालचालीस आणि इतर प्राण्यांची वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

नागरिक व व्यावसायिकांनी घाबरून न जाता या भागातील कुक्कुट शेडचे व अन्य पाळीव प्राणी यांचे गोठयांचे प्रवेशद्वार व परिसराचे निर्जंतुकिकरण करावे, असे आवाहनही डॉ.शेजाळ यांनी केले आहे.