शेतकरी आंदोलन: पाकिस्तानातून ट्रॅक्टर मोर्चा ‘हायजॅक’ होण्याची शक्यता, पोलिसांचा दावा

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. प्रजासत्ताक दिनी काढण्यात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांची दिशाभूल करत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आतयाची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी तसा दावा केला आहे. दरम्यान विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असं सांगितलं आहे.

दीपेंद्र पाठक म्हणाले, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. याबद्दल इतर यंत्रणांकडून माहिती मिळाली आहे. आमच्यासाठी हे मोठं आव्हान असणार आहे. मात्र तरीही प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत मोर्चा काढला जाईल.

काही दिवसापासून पाकिस्तानमधील ३०८ ट्विटर हॅण्डल्स Farmer Protest, Tractor Rally संबंधित हॅशटॅगचा सतत वापर करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी काहीतरी मोठी समस्या निर्माण करु शकतात असा धोका आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असही त्यांनी सांगितले.

नव्या कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. यामध्ये खासकरुन पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आहेत. कायदे रद्द केले जावे ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून यावर ते ठाम आहेत. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाचे काढू नये अशी विनंती केली. मात्र शेतकरी मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.