३२ वर्षीय महिला सहाय्यक वनसंरक्षक ६५,००० ची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वन कायद्या अंतर्गत जप्त केलेले साहित्य व ट्रॅक्टर सोडवण्यासाठी ७० हजार रुपयांची लाचेची मागणी करुन ६५ हजार रुपये लाच स्विकारताना वनविभागाच्या महिला सहाय्यक वनसंरक्षकाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शुक्रवार) औंध येथील वेस्टर्न मॉल येथे करण्यात आली. गिता विशाल पवार (वय – ३२) असे अटक करण्यात आलेल्या वनसंरक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तक्रारदाराने अॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून त्यांना पाठबंधारे विभागाचे पाईपलाइन टाकण्याचे काम मिळाले आहे. सदर काम चालू असताना टाकलेली पाईपलाईन ही वनखात्याच्या जमीनीत असल्याने तक्रारदार यांच्यावर वन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. वन खात्याने कारवाई  करुन साहित्य व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेले साहित्य व ट्रॅक्टर सोडविण्यासाठी वन खात्याचे तपासी अधिकारी गिता पवार यांनी ७० हजार रुपायांची लाच मागितली. तडजोडीमध्ये ६५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. ठरलेली लाचेची रक्कम औंध येथील वेस्टर्न मॉल येथे देण्याचे ठरले होते. याची तक्रार तक्रारदाराने पुणे अॅन्टी करप्शनकडे केली होती. पथकाने मॉलमध्ये सापळा रचून ६५ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवान, पोलीस उप अधीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे करीत आहेत.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.