नगर अर्बन बँकेतील 22 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी 4 माजी संचालकांना अटकपुर्व जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  पिंपरी चिंचवड येथील नगर अर्बन बँकेमध्ये 22 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक, कर्ज उपसमिती मधील सदस्य, उपाध्यक्ष, संचालक मंडळ इत्यादींवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संचालक राधा वल्लभ कासट, अशोकलाल कटारिया, अनिल कोठारी आणि अजय बोरा यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

चिंचवडमधील इंडियन इंजिनिअरींगच्या नावाने 11 कोटी रुपयांच्या कर्जासाठी बँकेच्या चिंचवड शाखेत अर्ज करुन त्यासाठी त्यांचा प्लॉट व बंगला गहाण ठेवला होता. व्यवस्थापनाने साडेसहा कोटींचे कर्ज मंजूर केले असताना संचालक मंडळाने दुर्लक्ष करुन 22 कोटींचे कर्ज मंजूर केले. 22 कोटी रुपये आरोपीच्या खात्यावर वर्ग केले. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड. सचिन झालटे पाटील व अ‍ॅड. अभिषेक जगताप यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दरम्यान, बँकेचे संचालक राजेंद्र गांधी यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे निवेदन दिले होते. यामध्ये गांधी यांनी पिंपरी चिंचवड शाखेतील कर्जप्रकरणातील मुल्यांकन करणाऱ्या बँकेच्या पॅनेलवरील मुल्यांकनकाराने नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या लेटरपॅडचा वापर करून 1 कोटी मुल्यांकनाची मालमत्ता 22 कोटी रुपये असल्याचे दाखवण्यात आल्याचे मुल्यांकाराचे म्हणणे आहे. या प्रकरणातील आरोपींचे राजकीय लागेबंध असलेली आणि राजकीय वजनदार व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात काही कारवाई होत नाही. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आरोपींना मदत केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपण या प्रकरणात लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राजेंद्र गांधी यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली होती.