महापारेषणच्या लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्रात बिघाड

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

महापारेषण कंपनीच्या लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्रात सोमवारी (दि. 6) दुपारी 1 वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीचे पुणे जिल्ह्यातील 220 केव्ही व 132 केव्ही क्षमतेचे 29 अतिउच्चदाब उपकेंद्रे बंद पडले. परिणामी पुणे शहरातील काही भागांसह पिंपरी चिंचवड, भोसरी तसेच चाकण, सणसवाडी, रांजणगाव एमआयडीसीसह ग्रामीण भागांतील काही शहरे व गावांमध्ये दुपारी 23 मिनिटे ते सव्वातासांपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता.
[amazon_link asins=’B00RM1EC1S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e4b0a83-9983-11e8-b543-cf28c44fa981′]

याबाबत माहिती अशी, की महापारेषणच्या लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्रात आज दुपारी 1.06 वाजता तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या उपकेंद्रातून वीजपुरवठ्यासाठी अवलंबून असणाऱ्या महापारेषण कंपनीच्या तब्बल 29 उपकेंद्रांचा सुद्धा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये 400 केव्ही लोणीकंद, चाकण उपकेंद्र तसेच 220 केव्ही भोसरी, चिंचवड, टेल्को, चाकण इंडस्ट्रीयल फेज टू, वॉक्सवॅगन, ब्रीजस्टोन, महिंद्रा, थेऊर, फुरसुंगी, सेरम, मगरपट्टा, रांजणगाव आणि 132 केव्हीचे मुंढवा, गणेशखिंड, एनसीएल, अंबेठाण, मरकळ, सणसवाडी, जॉन डिअर, एस्सार, निओसीम, बेकॉर्ट, व्हर्लपूल, फियाट व कल्याणी या उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद पडला.

महापारेषणच्या या सर्व अतिउच्चदाब उपकेंद्रांतून महावितरणच्या उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने नगररोड, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, गणेशखिंड, शिवाजीनगर, औंध, मगरपट्टा, खराडी, मुंढवा, केशवनगर, फुरसुंगी, वाघोली, हडपसर, बंडगार्डन, कोथरूड, वाकड, वारजे, पाषाण, बावधन, सुस रोड, कोंढवा, कात्रज आदी भागांचा वीजपुरवठा एका तासापर्यंत खंडित होता. यासोबतच पिंपरी, चिंचवड, भोसरी शहर, दिघी गाव, आकुर्डी, प्राधीकरण, आळंदी, चाकण, राजगुरुनगर ही शहरे तसेच कोरेगाव भिमा, रांजणगाव, सणसवाडी, शिक्रापूर आणि भोसरी, रांजणगाव, चाकण एमआयडीसी आदींसह परिसरातील काही गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.
[amazon_link asins=’B014PHNRE4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’25dd8578-9983-11e8-a1d1-4dbfb55a4281′]

महापारेषणकडून युद्धपातळीवर प्रयत्न करून लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्राचा खंडित वीजपुरवठा 23 मिनिटांनी पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महापारेषणचे उर्वरित सर्वच 28 अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा दुपारी 2.27 वाजेपर्यंत सुरु करण्यात आला. त्याप्रमाणे महावितरणचेही सर्वच उपकेंद्रे सुरु झाले व वीजपुरवठा सुद्धा पूर्ववत सुरळीत झाला.