Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट डॉक्टरांसाठीही धोक्याची; आतापर्यंत 420 डॉक्टरांचा मृत्यू, दिल्लीत सर्वाधिक 100 मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. या रुग्णांना आरोग्यसेवा-सुविधा देण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न सुरु आहेत. पण आता या कोरोनाने डॉक्टरांनाच विळखा घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आत्तापर्यंत तब्बल 420 डॉक्टर्सचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (IMA) रिपोर्टनुसार, देशातील 420 डॉक्टरांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दिल्लीतील 100 तर बिहारमधील 96 डॉक्टरांचा समावेश आहे. IMA ने जारी केलेल्या यादीमध्ये 22 राज्यांची नावे आहेत. त्यामध्ये दिल्ली पहिल्या, बिहार दुसऱ्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत 41 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाच्या या काळात डॉक्टर्स आणि आरोग्य विभागातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र, कोरोना वॉरिअर्सनाच कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे आत्तापर्यंत 864 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. IMA ने फ्रंटलाईन वॉरिअर्सच्या मृत्यूवरून काही दिवसांपूर्वी बिहार युनिटने मदतीचे आवाहन केले होते. कोविड ड्यूटी असल्याने अनेक डॉक्टरांना सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यातच या डॉक्टरांचा मृत्यू होताना दिसत आहे.

मृतांच्या आकड्यावरून चिंता
IMA ने जारी केलेली ताजी आकडेवारी भीतीदायक आहे. पहिल्या यादीत बिहारच्या सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. तर दिल्लीतील डॉक्टरांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध डॉक्टर के. के. अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्डियक सर्जन डॉ. प्रभाक कुमार यांचाही मृत्यू झाला होता.

आंध्र प्रदेशात 26 जणांचा मृत्यू
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पहिल्या, बिहार दुसऱ्या तर उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत 41 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर आंध्र प्रदेशातील 26 चिकित्सकांचा मृत्यू झाला आहे.