खुशखबर ! अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू

मुंबई : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने आज महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यामध्ये दिव्यांग शाळेतील 4899 शिक्षक व 6159 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील एकूण 11 हजार 58 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

सध्या दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासनमान्य अनुदानप्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात. सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील या सर्व कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार आता सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे.

दरम्यान, राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळेत काम करणाऱ्या 11 हजार 58 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार, एक अभ्यासगट नेमून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले होते. त्याची पूर्तता करत विभागाने आज याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

एका महिन्यात अंमलबजावणी

धनंजय मुंडे यांनी दोन महिन्यांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली होती. त्यानुसार ही घोषणा महिनाभरातच प्रत्यक्षात उतरवून दिव्यांग शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा अध्यादेश काढण्यात आला.