यवतमाळमध्ये ८ दिवस लॉकडाऊन होण्याची शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी ५११ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून पुढील आठ दिवस जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर करण्यात येत आहे असे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्याकडून देण्यात आले आहे.

यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले कि, जिल्ह्यात गेल्या वर्षभरात मंगळवारी सर्वाधिक ५११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामध्ये १७५ रुग्ण यवतमाळ तर १६५ पुसदमधील आहेत. सावधगिरी म्हणून कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणीची संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच पूर्वी दरदिवशी दीड हजार तपासणीचे असलेले हे उद्दीष्ट आता दुप्पट करून तीन हजार करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात सध्या १२० प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले गेले आहे.

केंद्रीय पथकाचे डॉ. आशिष रंजन यांनी नुकतीच यवतमाळ येथे भेट देऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्रीय पथकाकडूनसुद्धा ८ दिवसांचा लॉकडाऊन करण्याची शिफारस करण्यात आली. त्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी टास्क फोर्सची बैठक बोलावण्यात आली. लाॅकडाऊन लावायचा का आणि लावल्यास त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची याबाबतचा अहवाल संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याकडून मागवण्यात येणार आहे. त्यानंतरच लॉकडाऊन बाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेता लाॅकडाऊन गरजेचा वाटत असून नागरिकांनी काही दिवस कड सोसणे आवश्यक असल्याचे व जागरुकता, सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात ४ तालुके हॉटस्पॉट
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पुसद, दारव्हा व यवतमाळ हे चार तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. नगरपालिका क्षेत्रासोबतच लगतच्या ग्रामीण परिसरात सुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांचा आकडा १५ हजार ८०० च्या पुढे गेला आहे तर मृतांची संख्या ४६७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ८०३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.