85 वर्षांच्या आजींची अनोखी इच्छा; संपूर्ण जमीन करणार नरेंद्र मोदींच्या नावे

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश राज्यातील मैनपुरी जिल्ह्यामध्ये बुधवारी एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. येथे एक आजी आपली संपूर्ण जमीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्यासाठी थेट तहसील कार्यालयामध्ये पोहाेचल्या. या आजींना आपली संपूर्ण जमीन पंतप्रधान मोदी यांच्या नावावर करण्याची इच्छा आहे, असे ऐकल्यानंतर वकीलही हैराण झाले. आपली सर्व शेती पंतप्रधान मोदी यांच्या नावावर करण्यासाठी या आजी आडून बसल्या आहेत. यामागचे कारण अत्यंत भावुक करणारे आहे.

या 85 वर्षीय आजींचे नाव बिट्टन देवी आहे. त्या पूरन लाल यांच्या पत्नी आहेत. त्या विकास खंड किशनीतील गाव चितायन येथे राहत आहेत. त्या बुधवारी दुपारी वकील कृष्णप्रताप सिंह यांच्याकडे गेल्या. त्यांनी वकिलाला सांगितले, की आपली साडेबारा बीघे जमीन आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर करायची इच्छा आहे. बिट्टन देवी यांनी असे म्हणताच वकील हैराण झाले. यानंतर वकील कृष्णप्रताप सिंह यांनी बिट्टन देवी यांना बराच काळ समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आहेत.

यानंतर वकिलांनी त्यांच्यासंदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिट्टन देवी म्हणाल्या, त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यांची दोन मुले आणि सूना त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. सरकारकडून मिळत असलेल्या वृद्धावस्था पेन्शनने त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत. यामुळे आपल्या नावावर असलेली शेती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर करण्याची आहे, अशी त्यांची इच्छा आहे.

यानंतर, वकील कृष्णप्रताप सिंह यांनी यासंदर्भात आपण उपजिल्हाधिकार्‍यांना बोलू, असे सांगून त्यांना घरी पाठवले आहे. यानंतर, आपण दोन दिवसांनी पुन्हा येऊ, असे सांगून आजी परतल्या.