धनंजय मुंडे यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी तळणी येथील मुंजा किशनराव गित्ते यांची जमीन खरेदी केली होती. या बदल्यात त्यांना ४० लाखांचा धनादेश देण्यात आला होता. परंतु सदरील धनादेश बॅंकेतून परत आल्यामुळे गित्ते यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्याच्या उभारणीसाठी तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी आपली ३ हेक्टर १२ आर जमीन दिली होती. या जमिनीच्या मोबदल्यापोटी गित्ते यांना ४० लाखांचा धनादेश देण्यात आला. मात्र दिलेला धनादेश बॅंकेत न वटल्याने या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात शेतकरी कुटुंबाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी अंबाजोगाई येथील न्यायालयात दोषारोप पत्र क्र . ४५/२०१८ दि. २१ डिसेंबर २०१८ असा असल्याची माहिती मंजू गित्ते यांचे मामा तथा कॉंग्रेसचे वसंत मुंडे यांनी दिली आहे.