स्वच्छ सर्वेक्षणात पुणे कॅन्टोन्मेंट अपयशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेपाठोपाठ संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागातर्फे दिल्या जाणाºया रक्षा मंत्री पुरस्कार स्पर्धेतही पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड अपयशी ठरले आहे. यंदाच्या रक्षा मंत्री-स्वच्छ छावणी, स्वस्थ छावणी पुरस्कारावर दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डाने मोहोर उमटवली आहे. मागील वर्षी या पुरस्कारासाठी देशभरातील ६२ कन्टोन्मेंटमधून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवड झाली होती. मात्र, पुणे कॅन्टोमेंट केंद्राच्या पाहणीत यंदा ‘अस्वच्छ‘ असल्याने या पुरस्कारांच्या एकाही श्रेणीत पुणे कन्टोन्मेंटला स्थान मिळविता आलेले नाही. दरम्यान, याबाबत संरक्षण मालमत्ता विभागाच्या महासंचालकांना पत्र पाठविणार असल्याचे बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी यांनी सांगितले.

संरक्षण मालमत्ता विभागातर्फे (डिफेन्स इस्टेट) दिल्लीत आयोजित ‘डिफेन्स इस्टेट डे‘ कार्यक्रमात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सर्वाधिक स्वच्छ कॅन्टोन्मेंटचा मान पटकावलेल्या दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डाला स्वच्छ छावणी पुरस्काराने गौरविले, तर राज्यातील एकट्या अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाची या पुरस्कारासाठी निवड झाली. रुग्णालयाच्या सुधारणेसाठी तमिळनाडूतील सेंट थॉमस माउंट कॅन्टोन्मेंट बोर्डासह अहमदनगर कॅन्टोन्मेंटला पुरस्कार देण्यात आला आहे.

संरक्षण मालमत्ता विभागाने मागील वर्षी रक्षा मंत्री स्वच्छ छावणी-स्वस्थ छावणी पुरस्कारासाठी पुणे कँटोन्मेंटची निवड केली होती. मात्र, त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा-२०१७ मध्ये पुणे कँटोन्मेंटला देशभरात २६ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे बोर्डाने घरोघरी कचरा संकलन व कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि कॅपिंग, मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प असे प्रकल्प हाती घेतल्या. मात्र, त्यानंतरही पुरस्कारांवर शिक्कामोर्तब करण्यात बोडार्ला अपयश आले आहे.

लष्करमध्ये घंटागाड्या बंदच

लष्कर परिसरातील विविध वॉर्डातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. प्रशाासनाने घंटागाड्या बंद केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी स्वच्छतेसंदर्भात बोर्डाच्या उपाययोजना केवळ कागदावरच राहिल्या असल्याचे बोर्डाच्या आरोग्य समितीचे सदस्य अतुल गायकवाड यांनी व्यक्त केली.