‘या’ कारणामुळे सिद्धू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ! 

पंजाब : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या दौऱ्यावरून परत आलेले नवज्योतसिंग सिद्धू  पुन्हा एका कारणावरून वादात सापडले आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना एक पक्षी भेट म्हणून दिला आहे. या भेट स्वरूपात  दिलेल्या पक्षावरून वाद निर्माण झाला आहे. हा भेट दिलेला पक्षी लुप्त होत जाणाऱ्या प्रजातीत येतो. याप्रकरणी सिद्धू यांच्याविरोधात नवी दिल्लीच्या वाईल्डलाईफ क्राइम कन्ट्रोल ब्यूरोमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पंजाबच्या वाईल्डलाईफ क्राइम कन्ट्रोल ब्यूरोचे स्वयंसेवक संदीप जैन यांनी नवज्योतसिंग सिद्धू  यांच्याविरुद्ध ही तक्रार केली आहे. यासंबंधी संदीप जैन म्हणाले, ‘मला वर्तमानपत्रातील बातमीवरून  कळाले की, पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिंद्धू यांनी पाकिस्तानातून ‘ब्लॅक पॅट्रीज पक्षी’ भारतात घेऊन आले आहेत. हा पक्षी त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना भेट दिला आहे.

या कारणाने  तक्रार दाखल –
एखादा प्राणी किंवा पक्षी भेट देणे हे वन्यप्राणी संरक्षण कायदा १९७२चे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळेच आपण नवी दिल्लीच्या वाईल्ड लाइफ क्राइम कन्ट्रोल ब्युरोमध्ये सिद्धू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पाकिस्तानातून आणलेला ब्लॅक पॅट्रिज पक्षाला इतका काळ भारतात कसे काय ठेवण्यात आले? असा सवाल  त्यांनी केला . लुप्त होत असलेल्या कोणत्याही प्राण्याच्या किंवा पक्षाच्या प्रजातीला किंवा त्याच्या शरीराच्या अवशेषांना परवानगीशिवाय जवळ बाळगणे बेकायदा आहे. त्यामुळे तक्रारीत आपण या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे, असे जैन यांनी सांगितले.