काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात 5 दिवसात निर्णय होण्याची शक्यता : पृथ्वीराज चव्हाण

कराड : पोलीसनामा ऑनलाइन –   एक नेता, एक पद यासाठी काँग्रेसमध्ये पूर्वीपासून विचार सुरु आहे. पक्षश्रेष्ठींच्या विचारानुसार आता यावरती चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के पाटील यांनी यासंदर्भात आमदारांची मते जाणून घेतली आहे. त्यामुळे आता सुरु असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाबद्दल ठोस निर्णय होईल की नाही, हे आपणास माहिती नाही, पक्षश्रेष्ठी लवकरच यावर आपली भूमिका स्पष्ट करतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ते कराडमध्ये बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाविकास आघाडी सत्तेवर आल्यांनतर मला विधानसभा सभापती पदाबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र, सक्रिय राजकारणात आणि विधानसभा मतदारसंघाला जास्त वेळ देता आला नसता, याचा विचार करुन आपण सभापती पद नाकारले. यामुळे आपणास सभापती पदात रस नसल्याचे अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितले.”

पूर्वीपासून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एक नेता, एक पद अशी संकल्पना विचाराधीन आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विधानसभेतील गटनेते, प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री अशी तीन पदे आहेत. यामुळे कोणत्याही एका पदास योग्य रीतीने न्याय देता येत नाही, असे काही जणांचे मत आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने जबाबदाऱ्यांचे विभाजन करण्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. जबाबदारीचे विभाजन होईल की नाही, हे माहिती नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी येताच चार ते पाच दिवसांत जबाबदारीत बदल होणार की, नाही हे समोर येईल, असे स्पष्ट संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.