दशावतारी नाट्य महोत्सवास चांगला प्रतिसाद

सिंधुदुर्ग: पोलीसनामा ऑनलाईन
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित 42 व्या दशावतारी नाट्य महोत्सवास रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) सतीश लळीत यांच्या उपस्थितीत ओरोस येथील देव रवळनाथ मंदिर येथे झाले.

या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, रवळनाथ ट्रस्टचे अध्यक्ष महादेव परब, लिंगेश्वर देवस्थान ओरोसचे अध्यक्ष रामचंद्र परब, ओरोस देवस्थान समिती अध्यक्ष तानाजी परब, पोलीस पाटील भगवान कदम, ओरोसचे उपसरपंच मनस्वी परब, सहाय्यक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे, वि.का. ठाणे, परिक्षक, डॉ अशोक भाईडकर, मोहन मेस्त्री, सुधाकर वळंजू आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना लळीत म्हणाले की, दशावतार ही प्राचिन कला आहे. संत रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथामध्ये चांगले वर्णन करुन ठेवले आहे. ही कला जवळ जवळ 750 वर्षांपूर्वीची आहे. दिनांक 20 एप्रिलपासून सुरु झालेला हा महोत्सव 8 मे 2018 पर्यंत सुरू राहणार आहे. या दशावतार नाट्य महोत्सवात नामांकीत कंपन्या नाट्य प्रयोग सादर करत आहेत. या पुढे या महोत्सवामध्ये पुढील प्रमाणे नाट्य प्रयोग होणार आहेत. मलकापूर पावन तिर्थक्षेत्र, मृत्यूंजय, सत्व परीक्षा, दैव योग, भीष्म प्रतिज्ञा, असूर निर्दालन, गरुड झेप, भर्तरी पिंगला, संजीवनी मंत्राची प्राप्ती, प्रतीव्रतेचा पुण्यप्रभाव, कंठक कपाल कंठक वध असे नाट्य प्रयोग सादर होणार आहेत. या महोत्सवास दशक्रोशीतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.