सरपंचाच्या गाडीची काच फोडून पळवले ३ लाख

चाकण : पोलीसनामा आॅनलाइन – स्कॉर्पिओ गाडीची काच फोडून चोरट्यांनी गाडीतील तीन लाख रुपये लंपास केले. ही घटना आंबेठाण चौकातील राजगुरुनगर सहकारी बँकेसमोर रविवारी (दि.९) दुपारी घडली. भरदिवसा हा प्रकार घडल्याने भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी देशमुखवाडीचे सरपंच संजय ज्ञानेश्वर देशमुख (वय-४६ रा. स्वप्न नगरी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गालगत बँकेच्या आवारात ही घटना घडली आहे. देशमुख यांनी ट्रक विकून आलेले तीन लाख रुपये स्कॉर्पिओ गाडीत (एमएच १४ डी आर ७१७२) पिशवीत ठेवून ते बँकेत चेक भरण्यासाठी गेले होते. अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या गाडीची काच फोडली व पैशांची बॅग घेऊन पोबारा केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे पुढील तपास करीत आहेत. राजगुरूनगर बँकेसमोर सातत्याने रोख रक्कम लुटण्याच्या घटना घडत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही भरदिवसा बँकेच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत.