नवीन वर्षात महागल्या बाईक, 1 जानेवारीपासून हीरो मोटोकॉर्प मोटारसायकलींच्या किंमतीत होणार वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षात कार आणि दुचाकी खरेदीदारांना महागाईचा धक्का बसणार आहे. आता हीरो मोटोकॉर्पनेही त्यांच्या मोटारसायकलींच्या किंमती 1 जानेवारीपासून 1,500 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे दुचाकीच्या किंमती वाढविणे भाग पडले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यापूर्वी मारुती, महिंद्रा सारख्या कंपन्यांनी त्यांच्या कार आणि इतर वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

अनेक कंपन्यांची वाहने महाग
देशातील 4 बड्या ऑटो कंपन्या त्यांच्या कार, एसयूव्हीची किंमत वाढवणार आहेत. यामध्ये मारुती, महिंद्रा, किया, ह्युंदाई यांचा समावेश आहे. या कंपन्या जानेवारी 2021 पासून त्यांच्या कार महागड्या करु शकतात. महत्त्वाचे म्हणजे वर्षाच्या सुरूवातीस बहुतेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंमत वाढवतात.

काय म्हटलं हिरो मोटोकॉर्प
हीरो मोटोकॉर्पने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे की, “वस्तूंच्या किंमतीवरील वाढत्या परिणामाची अंशतः भरपाई करण्यासाठी आम्ही 1 जानेवारी 2021 पासून आमच्या उत्पादनांच्या किंमती वाढवत आहोत.”

का वाढल्या किंमती
कंपनीने सांगितले की, ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार बदलली जाईल आणि लवकरच डीलर्सना तपशील पाठविला जाईल. स्टील, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक आणि मौल्यवान धातू यासारख्या कच्च्या मालाची किंमत सातत्याने वाढत असल्याचे हिरो सांगते. कंपनीने म्हटले आहे की, त्याने लीप -2 अब्रेला अंतर्गत आपला बचत कार्यक्रम वेगवान केला आहे आणि ग्राहकांवर वाढणार्‍या खर्चाचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करेल.

सप्टेंबरच्या तिमाहीत झाली चांगली विक्री
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत हीरो मोटोकॉर्पचा निव्वळ नफा 8.99 टक्क्यांनी वाढला असून त्याचा एकूण नफा 953.45 कोटी होता. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 23.7 टक्क्यांनी वाढून 9,367 कोटी रुपये झाले आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीने एकूण 18.22 लाख वाहनांची विक्री केली आहे.