दारुच्या बॉक्सची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला, तळीरामांची झाली चांदी (व्हिडीओ)

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन –   दारुच्या बॉक्सची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उलटला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावातील तळीरामांनी दारुच्या बाटल्या घेण्यासाठी एकच गर्दी केली. गावकऱ्यांनी नाहीतर मार्गावरुन जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी अक्षरश: बॉक्सच पळवून नेले. ही घटना मंगळवारी दुपारी मुंबई-आग्रा माहामार्गावर उमराणे गावजळ घडली.

दारुचे बॉक्स एका ट्रॅक्टरमधून नेण्यात येत होते. पण अचानक रस्त्याच्या बाजूचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उलटला. अपघात झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या चालक आणि त्याच्या जोडीदाराला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ट्रॅक्टर पलटी झाल्यावर त्यातील दारुचे बॉक्स व बाटल्या खाली पडल्याचे पाहून तळीरामांनी संधी साधत दारुचे बॉक्स पळवून नेले.

दारुच्या बाटल्या घटनास्थळी पडल्याचे पाहून रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर वाहन चालकांना देखील याचा मोह आवरला नाही. वाहन चालकांनी गाडी थांबवून दारुचे बॉक्स पळवून नेले. दारुचे बॉक्स घेण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे मार्गावरील वाहतूक काहीवेळासाठी विस्कळीत झाली. स्थानिक लोकं आणि वाहनधारकांनी गाड्या थांबवून बॉक्स आणि बटल्या चोरून पोबारा केला.

विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडीओ काढला जात असल्याचे माहिती असताना देखील त्याची पर्वा न करता दारु चोरुन नेली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस येण्यापूर्वी लोकांनी दारुचे बॉक्स चोरुन नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिायवर व्हायरल होत आहे.