Pune : कर्जावरील व्याज न दिल्याने २४ वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण; दोघांना बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जावरील व्याज न दिल्याने येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थ्याचे सहा ते सात जणांनी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाणही केली. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी या विद्यार्थ्याची सुटका केली असून सात जणांवर गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली आहे.

अनिकेत राज (रा बालाजी व्हीला कात्रज) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे तर गिरीश कदम, दीपक प्रदीपकुमार सिंग, गणेश मानकर, निखील नंदकुमार कदम आणि त्यांच्या अन्य तीन ते चार साथीदारांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अनिकेतने काही दिवसांपूर्वी अपहरणकर्त्यांपैकी दोघांकडून एक लाख ४० हजार रुपये कर्ज घेतले होते. या पैशाची परतफेड करण्यासाठी महिन्याला २० हजार रुपये देण्याचे ठरवले अनिकेतने ही अट मान्य केली होती. दरम्यान लॉकडाऊन लागल्याने अनिकेतने मुद्दल दिली पण त्याला कर्जावरील व्याज देता आले नाही. त्यामुळे कर्जावरील व्याजासाठी आरोपींच्या १८ मेला साथीदारांनी अनिकेतच अपहरण केलं.

सुरुवातीला अनिकेतला स्टेंजा हॉस्टेलमध्ये दाबून ठेवले. यानंतर त्याला जवळच असलेल्या एका सदनिकेत नेहण्यात आले तेथे त्याला मारहाण करण्यात आली. तसेच व्याजाचे पैसे लगेच देण्यास सांगितले. अनिकेतने हा सर्व प्रकार वडिलांना सांगितलं. त्यानंतर अनिकेतच्या वडिलांनी तत्काळ भारती विद्यापीठ पोलिसात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून अनिकेतची सुटका केली. त्याच बरोबर दोघांना अटक केली असून अन्य जणांचा शोध सुरू आहे.