कुख्यात गँगस्टर अबू सालेमचे गुडघ्याला बाशिंग

नवी मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील तुरुंगात असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. यासाठी त्याने लग्नाचे कारण दिले आहे त्यासाठी सुट्टी मिळावी असे अर्जात म्हटले आहे. कौसर बहार या त्याच्या नव्या प्रेयसीशी तो विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कौसर बहार आणि अबू सालेम यांचा निकाह पाच मे रोजी ठरला असल्याचे समजते. हे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

अबू सालेमचे मोनिका बेदीसोबतचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यावर आता कौसर बहार नावाची 27 वर्षांची तरुणी आली आहे.
”मी अबू सालेमचा आवाज ऐकूनच त्याच्या प्रेमात पडले”, असे मोनिका बेदीने म्हटले होते. मोनिका बेदीला चित्रपट मिळवून देण्यातही अबू सालेमचा मोठा हात होता. अटकेनंतर अबू सालेम आणि मोनिकाची भेट झाली नसल्याचे तिने सांगितले.
मुंबईतील 93च्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा हात आहे. तसेच खंडणी, हत्या यांसारखी प्रकरणेही त्याच्याविरोधात सुरु आहेत. 1993च्या स्फोटाच्या प्रकरणात सहभागासाठी टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.